
कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक ः आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक संशोधनाशी जोडण्याचे प्रयत्न करावे असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त ’आयुर्वेद व सौंदर्यशास्त्र’ याविषयावर कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी पुणे येथील नामांकित वैद्य हरीष पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, आयुष विभाग प्रमुख डॉ गितांजली कार्ले, डॉ अनुश्री नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आयुर्वेद हे केवळ एक उपचार पद्धती नाही, तर ती एक जीवनशैली आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी, वैद्यांनी निसर्गाचा अभ्यास करुन हे ज्ञान मिळवले आहे. आजच्या युगात, जिथे प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक पुरावा लागतो, तिथे केवळ परंपरेवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. आता गरज आहे, आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवयास लागली आहे. आधुनिक संशोधन मानकांप्रमाणे या उपचार पद्धतीस जोडण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आयुर्वेदात शारीरिक आणि मानसिक आरोग्याला महत्व दिले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला केवळ एक उपचार पध्दती म्हणून नव्हे, तर एक जीवनशैली म्हणून पाहिले जाते. असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी आयुष विभाग प्रमुख डॉ गितांजली कार्ले यांनी सांगितले की, आयुर्वेदाचा उद्देश केवळ रोग बरा करणे नाही, तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन प्रदान करणे हा आहे. आयुष मंत्रालयाने निर्देशित केल्याप्रमाणे २०२५ पासून राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा दरवर्षी दि. २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पुणे येथील हरीष पाटणकर यांनी सांगितले की, आधुनिक काळात सौंदर्याच्या व्याख्या बदलल्या आहेत. रासायनिक उत्पादने आणि उपचारांनी तात्पुरते सौंदर्य मिळते, पण त्याचे दीर्घकाळ चालणारे दुष्परिणामही आहेत. या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदाने दिलेले सौंदर्यशास्त्र हे चिरंतन आणि नैर्सगिक आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ स्वाती जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरीता मेगा बोरसे, शितल आभाळे, मीना सूर्यवंशी, सागर कुलकर्णी, लोकेश गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.