
करिअर मार्गदर्शन व्याख्यानात राजरत्न वाहुळ यांचे प्रतिपादन
येवला : जागतिक स्तरावर रोजगार, सेवा, उद्योग-व्यवसाय करण्याच्या संधी युवा पिढीला उपलब्ध होत असून स्पर्धा प्रतीक्षेत यशस्वी होऊन देश सेवेत सामील होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगाव्याप्रमाणे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करावी, असे प्रतिपादन भारतीय अकॅडमीचे संचालक प्रा राजरत्न वाहुळ यांनी धर्मांतर घोषणेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित १७ व्या मुक्ती महोत्सवात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन व्याख्यानात बोलताना केले.
जागतिकीकरणात भांडवलशाही अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असताना युवा पिढीने लोकशाही व्यवस्था अधिक सशक्त करण्यासाठी देश सेवेच्या कार्यात यावे त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग बँक सेवा, पोलीस भरती, रेल्वे भरती, सामान्य प्रशासन, स्पर्धा परीक्षा अडचणी, अभ्यास तंत्र अशा वेगवेगळ्या विभागात शासकीय नोकऱ्यांची संधी ग्रामीण कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना खुणावत असून जिद्द चिकाटी मेहनत आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून योग्य वयात कमावते बनवून आपल्या घर परिवाराला पालकांना भक्कम आर्थिक बळ देण्याचे काम युवक युवतीने करावे असे मत प्रा राजरत्न वाहून यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे प्राचार्य अरुण विभूते होते. उपप्राचार्य अंबादास ढोले, प्रा बाळासाहेब आहेर, प्रा दीपक खरे, मनीषा गोसावी, प्रा आशा डांगरे, प्रा मनीष बोरकर, प्रा प्रियांका कोटमे, मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक प्रवर्तक प्रा शरद शेजवळ, प्रा नंदकुमार बाविस्कर हे मान्यवर, स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
मुक्ती महोत्सव समितीचे अक्षय गरुड, ललित भांबेरे, साहिल गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा दीपक खरे यांनी केले. मनीष बोरकर यांनी आभार मानले.