
नाशिक ः निफाड येथील क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू वेदांत पडोळ याने राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सांघिक सुवर्णपदक प्राप्त केले.
राष्ट्रीय १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे उत्साहात संपन्न झाली. त्यात निफाड येथील क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू वेदांत सचिन पडोळ याने उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुज्जर तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी आदींनी वेदांत पडोळ याचे अभिनंदन केले आहे. वेदांत पडोळ हा क्रीडा सह्याद्री क्लबमध्ये पाच वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. क्रीडा मार्गदर्शक विलास गायकवाड यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे.