
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः आलोक खांबेकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत राऊडी सुपर किंग्ज संघाने एमजीएम क्रिकेट अकादमी संघावर ८४ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यात आलोक खांबेकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. राऊडी सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि धमाकेदार फलंदाजी करत २० षटकात आठ बाद २०४ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात एमजीएम क्रिकेट अकादमी संघ २० षटकात सात बाद १२० धावा काढू शकला. त्यामुळे एमजीएम अकादमीला ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यत पांडुरंग गाजे याने ३३ चेंडूंत ५४ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. त्याने या खेळीत आठ चौकार व दोन षटकार मारले. सुमित अग्रे याने अवघ्या १३ चेंडूंचा सामना करत ३१ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. सुमित चव्हाण याने चार चौकारांसह २२ चेंडूंत २६ धावा फटकावल्या.
गोलंदाजीत आलोक खांबेकर याने प्रभावी गोलंदाजी करुन ३३ धावांत तीन गडी बाद केले. या कामगिरीमुळे आलोक खांबेकर हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. राजू परचाके याने २१ धावांत दोन गडी बाद केले. निनाद खोचे याने २५ धावांत दोन बळी टिपले.