
मुंबई ः सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे, आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली दक्षिण मुंबई विभागीय निवड चाचणी विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत जितेंद्र जाधव, सार्थक घाडीगावकर, वेदांत मोरे, अर्णव पवार आदींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दमदार प्रारंभ करणाऱ्या यश गोळेला उत्तरार्धात अचूक खेळ करीत जितेंद्र जाधवने ८-३ अशी बाजी मारली आणि विजयीदौड कायम राखली. दुसऱ्या सामन्यात सार्थक घाडीगावकरने आयुष पालकरचा ९-० असा एकतर्फी पराभव केला.
प्रारंभीचे बोर्ड हातून निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या अथर्व गायकवाड याला वेदांत मोरेने संयमी खेळ करीत ९-० असे नमविले. डावाच्या मध्यापर्यंत आघाडी घेणाऱ्या वेदांत हळदणकरला अर्णव पवारने १०-४ असे चकविले. अन्य सामन्यात स्वरूप आंब्रेने श्रेयस गायकवाडला १५-७ असे, दुर्वांक शेलारने संचित जगतापला १२-२ असे तर तन्मय चव्हाणने स्वस्तिक सुर्वेला ८-० असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मुंबईत २४ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश मिळविण्यासाठी दैवत रंगमंच-भायखळा येथे विभागीय शालेय खेळाडूंमध्ये चुरस आहे.