
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः अनिल घुगे, राहुल जोनवाल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने महाराणा ११ संघावर तब्बल ११४ धावांनी शानदार विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने लकी क्रिकेट क्लबवर आठ विकेट राखून मोठा विजय मिळवत आगेकूच कायम ठेवली. या लढतींमध्ये अनिल घुगे व राहुल जोनवाल यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रूफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. व्हिजन क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सर्वबाद २०१ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा सामना करताना महाराणा ११ संघ १४.१ षटकात अवघ्या ८७ धावांत गडगडला. त्यामुळे व्हिजन अकादमीने हा सामना ११४ धावांनी जिंकला.
या सामन्यात अभिषेक चव्हाण याने २९ चेंडूत ५१ धावांची वेगवान अर्धशतकी खेळी केली. त्याने आठ चौकार मारले. विक्रांत भालेराव याने २६ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले. अभिजित भगत याने तीन चौकार व एक षटकार ठोकत २७ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत अलीम शाह याने घातक गोलंदाजी करुन ३३ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. विजय घुसिंगे याने ४१ धावांत चार विकेट घेऊन लक्षवेधक कामगिरी बजावली. रामेश्वर चालके याने १० धावांत तीन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला.

लकी क्रिकेट क्लब पराभूत
दुसरा सामना लकी क्रिकेट क्लब आणि नाथ ड्रीप यांच्यात झाला. लकी क्लबने प्रथम फलंदाजी करताना १५.३ षटकात केवळ सर्वबाद ८३ धावा काढल्या. त्यानंतर नाथ ड्रीप संघाने ११ षटकात दोन बाद ८५ धावा फटकावत आठ विकेट राखून सामना जिंकला.
कमी धावसंख्येच्या सामन्यात रमेश शिराळे याने दोन षटकार व पाच चौकारांसह ४० धावा केल्या. इम्रान अहमद (२१) व ऋषभ पवार (१९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत अमोल उदावंत (३-२०), राहुल जोनवाल (३-२१) व सुरज जाधव (३-१६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी तीन गडी बाद केले. राहुलची कामगिरी अष्टपैलू राहिल्याने त्याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.