
बांगलादेश संघाचा ११ धावांनी पराभव, पाकिस्तानची प्रभावी गोलंदाजी घातक ठरली
दुबई ः पाकिस्तान संघाच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी अचूक आणि घातक गोलंदाजी करत बांगलादेश संघाला १२४ धावांवर रोखून ११ धावांच्या रोमांचक विजयासह आशिया कप टी २० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाचा सामना होईल. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला दोनदा पराभूत केले आहे. आता तिसऱ्यांदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा पहिल्यांदा अंतिम सामना होणार आहे.
पाकिस्तान संघाला १३५ धावांवर रोखल्यानंतर बांगलादेश संघ हा सामना सहज जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, पाकिस्तानी गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत बांगलादेश संघाची दाणादाण उडवून दिली.
परवेझ हुसेन इमॉन (०) पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर तौहिद ह्रदयॉय (५), सैफ हसन (१८), महेदी हसन (११) हे आघाडीचे फलंदाज आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट गमावून तंबूत परतले. बांगलादेश संघाने पाच विकेट ६३ धावांवर गमावल्या.
शमीम हुसेनचा अपवाद वगळता इतर फलंदाज आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद होत गेले. याचा मोठा फटका बांगलादेश संघाला बसला. शमीमने ३० धावांचे योगदान दिले. तन्झीम हसन साकिब (१०) याने थोडा प्रतिकार केला. बांगलादेश संघाने २० षटकात नऊ बाद १२४ धावा काढल्या. पाकिस्तानने हा सामना ११ धावांनी जिंकून अंतिम फेरी गाठली.
पाकिस्तान संघाकडून सईम अयुब (२-१६), शाहीन आफ्रिदी (३-१७), हरिस रौफ (३-३३), मोहम्मद नवाज (१-१४) यांनी प्रभावी गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
खराब फलंदाजी
आशिया कप सुपर फोरच्या नॉकआउट सामन्यात पाकिस्तानचा संघाची फलंदाजी खूप वाईट झाली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला पूर्णपणे रोखण्यात यश मिळवले. साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब आणि कर्णधार सलमान अली आघा यांच्यासह सर्व फलंदाज बाद फेरीत अपयशी ठरले. बांगलादेशकडून तस्किन अहमद, मेहदी हसन आणि रिशाद हुसेन यांनी शानदार गोलंदाजी केली आणि एकामागून एक सर्व पाकिस्तानी फलंदाजांना १३६ धावांत बाद केले.
टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाला. साहिबजादा फरहान पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ४ धावांवर बाद झाला. दुसऱ्या षटकात, या आशिया कपमध्ये चौथ्यांदा सैम अयुब ० धावांवर बाद झाला. फखर जमानही नॉकआउट सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही, २० चेंडूत १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आशिया कपच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा टॉप ऑर्डर कोसळला.
पाकिस्तानने ४९ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. पण शेवटच्या फलंदाजांनी डाव सावरला आणि पाकिस्तानला सर्वबाद होण्यापासून वाचवले. मोहम्मद हरिसने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर मोहम्मद नवाजने १५ चेंडूत २५ धावा केल्या. नॉकआउट सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला १३६ धावांचे लक्ष्य दिले आहे.