
मलकापूर ःजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा, बुद्धिबळ जिल्हा संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या संघाने शानदार कामगिरी बजावली. त्यांचे दोन खेळाडू विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण ६६ खेळाडू सहभागी झाले होते. स्कूल ऑफ स्कॉलर्स मधील १७ वर्षे वयोगटात इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ज्ञानिका विजय जैस्वाल व १४ वर्षे वयोगटात इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आनंदी सोमेश्वर शेलगेनवार या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजय नोंदवला. या कामगिरीच्या आधारे त्यांची अमरावती विभागीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, मनोज श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. खेळाडूंना स्कूल ऑफ स्कॉलर्सचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, क्रीडा शिक्षक मनीष उमाळे, विनायक सुरळकर, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या विजयी खेळाडूंना शाळेचे संचालक ॲड अमर कुमार संचेती, मुख्याध्यापिका डॉ सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.