
सासवड ः वाघिरे महाविद्यालय सासवड येथे एम. ए. राज्यशास्त्र प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला खेळाडू गणेश संजय तोटे याची १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान क्लुज-नापोका या रोमेनिया देशातील शहरात होणाऱ्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा संचालक डॉ सुदाम शेळके यांच्या हस्ते गणेश तोटे याचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व फकिरा ही कादंबरी देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ, सहाय्यक कक्षाधिकारी किशोर घडीयार व राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा लोणे उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी बोलताना डॉ सुदाम शेळके यांनी, “सर्वसामान्य खेळाडूंच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत समाजातील प्रत्येक घटकाने उभे राहणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन मंडळ व क्रीडा विभाग कायम खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेत आहेत, त्यामागे खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचे नाव मोठे करावे हाच हेतू आहे.” असे मत व्यक्त केले.
दावणगेरे, कर्नाटक येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत एकूण ८७५ किलोग्रॅम वजन उचलून १०५ किलोग्रॅम खालील वजन गटात गणेश तोटे याने आपले स्थान निश्चित केले. पॉवर लिफ्टिंग इंडियाने त्याची निवड जाहीर केली आहे. मूळ भिंगरी पनवेल येथे राहणारा गणेश तोटे गेल्या आठ वर्षांपासून फिटनेस ऑन जिम येथे पॉवर लिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.
भारतीय संघात स्थान मिळविल्याबद्दल त्याचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड संदीप कदम, खजिनदार ॲड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव प्रशासन ए एम जाधव, क्रीडा अधिकारी श्याम भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. सदर यशाचे श्रेय त्याने आई व वडील, प्रशिक्षक विशाल मुळे, प्रमोद पवार, वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांना दिले आहे. या प्रसंगी जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा निश्चय त्याने बोलून दाखवला.