एक्सलंट अकादमीच्या ऑटिझम खेळाडूंची चमकदार कामगिरी

  • By admin
  • September 27, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

मुंबई ः विद्याविहार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा महाकुंभ स्पर्धेत एक्सलंट तायक्वांदो अकादमीच्या ऑटिझम-डाउन सिंड्रोम खेळाडूंनी आपली चमकदार छाप पाडली. या खेळाडूंनी पुमसे प्रकारात १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावत आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला.

या स्पर्धेचे आयोजन राज्याचे राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. विशेषतः ऑटिझम सारख्या आजारामुळे सामाजिक व क्रीडाक्षेत्रात मागे राहिलेल्या खेळाडूंना या स्पर्धेने नवी दिशा दिली. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक्सलंट तायक्वांदो अकादमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व खेळाडूंच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एक्सलंट तायक्वांदो अकादमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी दहाहून अधिक ऑटिझम व डाउन सिंड्रोम खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा पुढाकार घेतला आहे. “दिव्यांग खेळाडूंनाही समाजात मान-सन्मानाने स्थान मिळावे व खेळाच्या माध्यमातून त्यांची स्वतःची ओळख निर्माण व्हावी,” हे ध्येय ठेवून ते अविरत परिश्रम घेत आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल आधार पुनर्वसन केंद्र मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संचालिका सोनल सिंग, डॉ. मिताली भोसले, महिमा ठाकूर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व अकादमीचे संस्थापक निरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच लता कलवार, तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे पदाधिकारी तुकाराम म्हात्रे, सलील झवेरी, दीपक मालुसरे, कौशिक गरवालिया, सुरेंद्र कांबळी, श्रीकांत शिवगण व प्रमोद कदम यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पदक विजेते

सुवर्णपदक – इक्ष्वाकू वशिष्ठ

रौप्य पदक – झिशान मोंडाल

कांस्य पदक – संस्कार बावस्कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *