
लहू मातेरे, प्रियंका गायकवाड, आर्या पवार यांची तीन सुवर्णपदकांची कमाई
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कन्नड तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तीन सुवर्णपदक, एक रौप्य पदक व तीन कांस्य पदके पटकावली आहेत. या विजयानंतर धामणी शाळेच्या क्रीडा वाटचालीत आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले आहे. ग्रामीण भागातील ही मुले केवळ क्रीडांगणावर झुंज देत नाहीत, तर ती संयम, मेहनत आणि जिद्द या मूल्यांची खरी शिकवण देतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये राष्ट्रीय खेळाडू आणि शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण थोरात, मुख्याध्यापक विकास पुरी, ज्येष्ठ शिक्षक प्रवीणकुमार अहिरे, सुरज जाधव, शंकर वळवळे, विशाल अंबादे व कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे.
विजयी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहाय्यक क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अशोक जंगमे व विश्वास जोशी, केंद्रीय मुख्याध्यापक विजय साळुंके, केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ, विस्तार अधिकारी डी टी शिंदे, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, सरपंच तानाजी दुधे, उपसरपंच पोपट हिंगे, किसन मातेरे, धनराज सोन्ने व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष मातेरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक ः लहू मातेरे, प्रियंका गायकवाड, आर्या पवार.
रौप्यपदक ः दिव्या सोनवणे.
कांस्यपदक ः आदित्य सोनवणे, रुद्रानी सोनवणे, अनुराधा सोनवणे.