
छत्रपती संभाजीनगर ः खारा कुआं परिसरातील नामांकित गुजराती प्रशालेत आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेने यंदा ५५ वर्षांचा टप्पा पार केला. पारंपरिक पातळीवरून आधुनिकतेकडे वाटचाल करत या स्पर्धेला यंदाही उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राजेशभाई मेहता व मुख्याध्यापिका भारती कल्याणकर मॅडम यांचे प्रयत्न विशेष ठरले. शिक्षक व कर्मचारीवर्गाने एकदिलाने परिश्रम घेऊन कार्यक्रमाला शोभा चढवली.

परीक्षक म्हणून उपस्थित असलेले ज्ञानेश्वर मनोहर क्षीरसागर यांनी मनोगतातून, “५५ वर्षांची परंपरा असूनही स्पर्धेत तरुणाई सारखा जोश दिसतो. संस्थेचा आत्मीयतेने केलेला आदरातिथ्य हा ‘खारा कुआं’ नव्हे तर ‘मीठा कुआं’ असल्याची जाणीव करून देतो,” असे मत व्यक्त केले.
स्पर्धेतील विषय निवडही मार्मिक व विचारप्रवर्तक होती. “शिक्षक म्हणजे नेहमीच आदरणीय, आवडते व आदर्श – हे ‘ट्रिपल आ’ या कसोटीवर सर्व शिक्षक खरे उतरले,” असे क्षीरसागर यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या यशामुळे संस्थेचा लौकिक वृद्धिंगत झाला असून पुढील वर्षी ५६व्या पर्वात या स्पर्धेला आणखी उंची लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.