
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः झिशान अली सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात लकी क्रिकेट क्लब संघाने टीम इलेव्हन संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. या सामन्यात झिशान अली याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात लकी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इलेव्हनने प्रथम खेळताना १७.४ षटकात सर्वबाद १०२ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना लकी क्रिकेट क्लबने १३.४ षटकात सात बाद १०३ धावा फटकावत तीन विकेट राखून सामना जिंकला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात जुनेद पटेल याने तुफानी अर्धशतक ठोकले. त्याने २९ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. त्यात त्याने चार चौकार व चार उत्तुंग षटकार मारले. अहमद बटोक याने पाच चौकारांसह २९ धावांचे योगदान दिले. अदनान अहमद याने १८ धावा काढल्या. त्यात त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत अर्शद खान याने प्रभावी मारा करत १४ धावांत चार गडी बाद केले. झीशान अली याने २६ धावांत तीन बळी टिपले. सरफराज पठाण याने १६ धावांत दोन गडी बाद केले.