
नागपूर ः विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे सिव्हिल लाईन्स येथील बिलिमोरिया हॉलमध्ये पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ९० हून अधिक पारितोषिके व रोख बक्षिसे वितरित करण्यात आली.
२०२४-२५ हंगामात बीसीसीआय व स्थानिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला नागपूरची कन्या आणि बुद्धिबळातील विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तर, दहा वेळा रणजी विजेता व विदर्भचा ज्येष्ठ फलंदाज वासिम जाफर हे विशेष अतिथी होते.
दिव्या देशमुख यांचे स्वागत उपाध्यक्ष डॉ अविनाश देशमुख यांनी पुष्पगुच्छ व चांदीचा मानाचा तुरा देऊन केले. त्यांनी दिव्याने साधलेली ऐतिहासिक क्रीडा यश संपन्न कामगिरी गौरवली व तरुण क्रिकेटपटूंशी अनुभव शेअर केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले.
आपल्या मनोगतात दिव्या देशमुख म्हणाली की, “ही माझी पहिली वेळ क्रिकेटपटूंमध्ये होती आणि मला हा उत्साहवर्धक माहौल खूप आवडला. खेळाडूंनी एकमेकांचे कौतुक करताना पाहणे छान वाटले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि नव्या हंगामासाठी शुभेच्छा.”

विशेष अतिथी वासिम जाफर यांचा सन्मान मान्यवर सचिव संजय बडकाश यांनी केला. जाफर म्हणाले, “विदर्भ क्रिकेट नेहमीच कनिष्ठ स्तरावर मजबूत राहिले आहे. आता वरिष्ठ स्तरावरही ते देशातील बलाढ्य संघांपैकी एक आहेत. मी पुन्हा एकदा विदर्भातील तरुण फलंदाजांसोबत काम करून त्यांची खरी क्षमता खुलवण्यास उत्सुक आहे.”
माजी भारत जलदगती गोलंदाज व विदर्भ क्रिकेट प्रशासन समितीचे अध्यक्ष प्रशांत वैद्य म्हणाले, “विदर्भ प्रीमियर टी-२० लीग यशस्वी केल्यानंतर आता तीच संकल्पना जिल्हा पातळीवर नेण्याचा मानस आहे. लहान वयातच खेळाडूंच्या फिटनेस व शक्तीवर भर देऊन मजबूत पाईपलाईन उभारण्याचे उद्दिष्ट आहे.”
या कार्यक्रमाला मान्यवर सचिव संजय बडकाश, संयुक्त सचिव गौतम काळे, खजिनदार सीए अर्जुन फाटक, कार्यकारिणी सदस्य अल्हाद गोकळे, अॅड आनंद देशमुख, समीर गुजर व चंद्रकांत माणके आदी उपस्थित होते.
प्रमुख विजेते
सर्वोत्तम कनिष्ठ फलंदाज: तुषार सुर्यवंशी
सर्वोत्तम कनिष्ठ गोलंदाज: संस्कार चव्हाटे
कनिष्ठ महिला फलंदाज: आर्या पोंगडे
कनिष्ठ महिला गोलंदाज: यशश्री सोळे
सर्वोत्कृष्ट ग्राउंड मार्कर: आशिष रोशनखेडे (रोख ५,०००)
विशेष गौरव
अंकिता गुहा – आयसीसी पॅनेलमध्ये निवड होणारी विदर्भातील पहिली महिला पंच.
उल्लास गंधे – १०० प्रथम श्रेणी सामने पंच म्हणून पूर्ण करणारे विदर्भातील पहिले पंच.
सोनीया राजोरिया, नामा खोब्रागडे (मॅच रेफरी) व पवन हलवामे, विक्रांत देशपांडे (पंच) – बीसीसीआय पॅनेलमध्ये समावेश.
कोच उस्मान गनी – रणजी व दुलीप ट्रॉफी विजयी प्रशिक्षक.
सात विदर्भ खेळाडू (हर्ष दुबे, यश ठाकूर, अक्षय वडकर, दानिश मालेवार, यश राठोड, आदित्य ठाकरे, नचिकेत भुते) व व्हिडिओ विश्लेषक अमित मणिकराव – दुलीप ट्रॉफी विजेत्या मध्य क्षेत्र संघाचा भाग.