
जळगाव ः जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस फारुक शेख यांचा विफा संघटनेचे अध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याची फुटबॉल संघटना असलेल्या विफा या संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपाध्यक्ष माजी मंत्री डॉ विश्वनाथ कदम, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार सुनील धांडे, सचिव डॉ किरण चौगुले आणि कोषाध्यक्ष सलीम परकोटे यांचा समावेश आहे.
मुंबईतील कूपरेज ग्राउंडच्या मीडिया हॉलमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी फारुक शेख यांना लॅपटॉप देऊन सन्मानित केले. सर्व जिल्ह्यांना विफाकडून १ लाख रुपये आणि डॉ विश्वजित कदम यांच्याकडून ५० हजार रुपये फुटबॉल उपक्रमांसाठी मिळाले. पुरस्कार समारंभात २०२४-२५ च्या उपविजेत्या संघांच्या कर्णधारांना फारुक शेख आणि अजगर पटेल यांनी सन्मानित केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत फारुख शेख यांनी खासदार क्रीडा महोत्सवात फुटबॉलचा समावेश करण्याबाबत माहिती देताच सभागृहाच्या अध्यक्षांनी तातडीने सभागृहाची मान्यता घेतली आणि भारतात होणाऱ्या या महोत्सवात फुटबॉलचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जळगावला २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली.