
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा येथे झालेल्या शालेय मुलामुलींच्या कॅरम मार्गदर्शनासह स्पर्धात्मक विनाशुल्क उपक्रमात उत्कर्षा कदम हिने विजेतेपद तर श्लोक शिंदे याने उपविजेतेपद पटकाविले.
अंतिम सामन्यात उत्कर्षा कदमने श्लोक शिंदेला २ गुणांनी चकविले. मुख्याध्यापक महेंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षिका वृषाली सावर्डेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदीं मान्यवरांनी विजेत्यांना गौरविले.
मुंबईत २५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कोकण कप शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये मुंबईतील गुणवान खेळाडूंना संधी देण्याच्या मागणीनुसार कॅरम मार्गदर्शनासह स्पर्धात्मक उपक्रमामध्ये एकूण ५६ शालेय मुलामुलींनी वडाळा येथे भाग घेतला.
उपांत्य फेरीत श्लोक शिंदेने श्रेयस जायभायेवर ४-० असा तर उत्कर्षा कदमने सुशांत कदमवर ३-० असा विजय मिळविला. पंचाचे कामकाज ओमकार चव्हाण, प्रॉमिस सैतवडेकर, साहिल परुळेकर, सचिन बुरुंगले, संजय बर्गे, प्रवीण शिंदे, मनीषा पुराडकर, रीना शेलार, शिवा पंडित, राजेश शिंदे आदींनी केले. शालेय मोफत कॅरम उपक्रमाचा तिसरा टप्पा ५ ऑक्टोबर रोजी सिबिईयु सभागृह, दादर-पश्चिम येथे होईल.