
- भारताचा पाकिस्तान संघावर सलग तिसऱ्यांदा विजय, अंतिम सामना ५ विकेटने जिंकला
– तिलक वर्मा विजयाचा हिरो, कुलदीप यादवची घातक गोलंदाजी
दुबई ः भारतीय संघाने एक नवा इतिहास घडवत आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तब्बल ४१ वर्षांनंतर पाकिस्तान संघ भारताशी अंतिम सामना खेळत होता. तीन बाद २० अशा बिकट स्थितीतून तिलक वर्मा याने संजू सॅमसन व शिवम दुबे यांच्या समवेत अर्धशतकी भागीदारी करुन संघाला संस्मरणीय विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तान संघाला पराभूत केले हे विशेष.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. या स्पर्धेत सलग तीन अर्धशतके ठोकणारा अभिषेक शर्मा केवळ ५ धावांवर बाद झाला. दुसऱ्या षटकात अभिषेक बाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम राहिला. सूर्या अवघी एक धाव काढून तंबूत परतला. त्यानंतर चौथ्या षटकात शुभमन गिल १२ धावांवर फहीम अशरफचा बळी ठरला. २० धावांवर भारताचे आघाडीचे तीन धमाकेदार फलंदाज बाद झाले.

तीन बाद २० अशा बिकट स्थितीत भारतीय संघ असताना तिलक वर्मा व संजू सॅमसन या जोडीने डाव सावरण्यास सुरुवात केली. संजूला एक जीवदान देखील लाभले. संजू व तिलक जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करुन संघाला विजयपथावर आणले. संजू २४ धावांवर बाद झाला. तेव्हा भारताच्या ७७ धावा झाल्या होत्या.
चार बाद ७७ धावांवर शुभम दुबे मैदानात उतरला. शुभम दुबे व तिलक वर्मा जोडीने आक्रमक फटकेबाजी करत दबाव कमी केला. पाचव्या विकेटसाठी या जोडीने अर्धशतकी भागीदारी करुन संघाला रोमांचक विजयाच्या अजून जवळ आणले. या जोडीने ४० चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. शिवम दुबे ३३ धावांवर बाद झाला. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. तिलक वर्माने हरिस रौफला उत्तुंग षटकार मारुन विजय निश्चित केला. रिंकू सिंग याने विजयी चौकार ठोकून संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिलक वर्मा भारतीय जेतेपदाचा हिरो ठरला. त्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावांची दमदार खेळी केली. दबावात संघ असताना त्याने तीन चौकार व चार उत्तुंग षटकार ठोकले. भारताने १९.४ षटकात पाच बाद १५० धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला. फहीम अशरफ याने २९ धावांत तीन गडी बाद केले. आफ्रिदी व अबरारने एक गडी बाद केला.

पाकिस्तानचा डाव गडगडला
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीमुळे संघाने पाकिस्तानला १९.१ षटकात १४६ धावांवर गुंडाळले. पाकिस्तानकडून सलामीवीर साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५७ धावा केल्या, तर भारताकडून कुलदीप यादवने चार बळी घेतले. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेमध्ये भारताला कोणतेही यश मिळवण्यापासून रोखले. साहिबजादानेही अर्धशतक झळकावले, परंतु वरुण चक्रवर्तीने साहिबजादाला बाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर, पाकिस्तानचा वेग कमी झाला आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून फखर जमानने ४६ आणि सॅम अयुबने १४ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी इतकी घसरली की त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांव्यतिरिक्त, इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी अंकाचा टप्पाही गाठता आला नाही.