
पुणे ः बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने होत असलेल्या व विवेक बापट, विदुला बापट व उदयन बापट यांनी पुरस्कृत केलेल्या दुसऱ्या श्रीमती सरल अनंत बापट मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नमित चव्हाण याने ७.५ गुणांसह आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
सिंबायोसिस स्पोर्टस सेंटर, प्रभात रोड या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत आठव्या फेरीत पहिल्या पटावर झालेल्या लढतीत नमित चव्हाणने ओम लामकाने याला बरोबरीत रोखले व ७.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, ओम लामकाने याने ७ गुण व ३९.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या आधारावर दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या पटावरील लढतीत सिद्धांत साळुंखे याने अनुष्का कुतवळ याचा पराभव करून ७ गुण व ३७.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या आधारावर तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ शिरीष गांधी, डॉ राकेश जामखेंडीकर, ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी संजय आढाव व प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर दीप्ती शिदोरे, श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिके
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : अनुष्का कुतवळ
सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू : किरण पंडितराव
सर्वोत्कृष्ट १७०० रेटिंग खालील खेळाडू : मार्मिक शहा
सर्वोत्कृष्ट १६०० रेटिंग खालील खेळाडू : तीर्थ कोद्रे
सर्वोत्कृष्ट १५०० रेटिंग खालील खेळाडू : सुमित पेठे