
मुंबई विभागीय स्पर्धेसाठी तीन जणांची निवड
ठाणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीने आयोजित ग्रामीण ठाणे जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा भाऊसाहेब परांजपे विद्यालय, अंबरनाथ येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) मधील ९ विद्यार्थी व आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे ६ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये शालेय योगपटूंनी उल्लेखनीय यश मिळवले. नववीतील संत सुनील मांजे याने १७ वर्ष गटात ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याच शाळेतील चेतना सोमनाथ साबळे हिने रिदमिक पेअर प्रकारात सुवर्णपदक व आर्टिस्टिक सिंगल मध्ये कांस्य पदक मिळवले. हर्षदा बाळू घोरपडे हिला रीदमिक पेअर प्रकारात सुवर्णपदक तसेच ट्रॅडिशनल प्रकारात रौप्यपदक मिळाले. इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेजच्या अंजली अरविंद राव हिने १९ वर्ष मुली गटात कास्यपदक पटकावले. कबीर बाळू इदे याने मुलांच्या गटात चौथा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या संत सुनील मांजे, हर्षदा घोरपडे व चेतना साबळे यांची आगामी मुंबई विभागीय योगासन स्पर्धेसाठी (३ व ४ ऑक्टोबर २०२५, यश विद्यानिकेतन, विरार पूर्व, पालघर) निवड झाली आहे.
या यशाबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या शहापूर शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उल्हास पाटील, कैलास थोरात, पौर्णिमा उपासनी, सूर्यकांत नवले, अक्षय बरकले आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कामगिरीमागे योग शिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख पुरुषोत्तम पानबुडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.