
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते २ लाख २९ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २०१२ नुसार शाळा व महाविद्यालयांना खेळाडूंना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देवगिरी महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दुहेरी यश संपादन केले.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात देवगिरी महाविद्यालयाच्या कनिष्ठ क्रीडा विभागाने १९ वर्षांखालील गटात सर्वाधिक खेळाडू सहभागी करून पदके जिंकली. त्याबद्दल महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे ८३,५३९ रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले.

त्यानंतर सन २०२३-२४ मध्येही १९ वर्षांखालील गटात महाविद्यालयाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावून ८३,५३९ इतक्या निधीने गौरव प्राप्त केला. तसेच १७ वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावून ६२,६५४ इतक्या निधीचा सन्मान मिळवला. अशा प्रकारे केवळ दोन वर्षांत एकूण २,२९,७३२ इतक्या निधीचा सन्मान देवगिरी महाविद्यालयाला मिळाला आहे.
क्रीडा दिनाच्या औचित्याने हा पुरस्कार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, क्रीडा विभाग प्रमुख व खेळाडू उपस्थित होते.
या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळ सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, रवी पाटील, अपर्णा तावरे, गणेश मोहिते, विजय नलावडे, शेखर शिरसाठ आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार, मंगल शिंदे, अमोल पगारे, शुभम गवळी, कृष्णा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.