
चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
नागपूर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा समिती हिंगना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतर शालेय कराटे स्पर्धेचे यशस्वी आयोजन हिंगना येथे करण्यात आले. या स्पर्धेत विविध तालुक्यांतील एकूण ३४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
१४, १७ व १९ वर्षे वयोगटातील वेगवेगळ्या वजन गटात आयोजित या स्पर्धेत तालुका स्तरावरील विजयी खेळाडूंचे रोमहर्षक सामने प्रेक्षकांना पाहवयास मिळाले. कामठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या के जॉन पब्लिक स्कूलच्या चार खेळाडूंनी उत्तम कामगिरी नोंदवत सुवर्णपदक प्राप्त केले. १४ वर्षांखालील मुलांच्या -२० किलो वजन गटात ध्रुव पाटनकर, १७ वर्षाखालील मुलांच्या -७८ किलो वजन गटात अर्णव सोनोने व अरहंत पाटिल याने ८२ किलो वजन गटात तर मुलींच्या १७ वर्षांखालील -५६ या वजन गटात तनुश्री महल्ले हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या चारही खेळाडूंची निवड ही पुढील महिन्यात गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता झालेली असून ते नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या खेळाडू व्यतिरिक्त रुद्र ठाकरे याने रौप्य पदक व लावण्य गवळी, वेदांत भोयर, ईशांत शेरकुरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले.
या शानदार यशाबद्दल शिक्षण संस्थेचे चेयरमन डॉक्टर जॉन केॉ व्ही, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली जॉन व शोतोकान कराटेचे अध्यक्ष सुरेंद्र उगले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सादिक अहमद व ज्योतिरादित्य उगले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.