
सासवड ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, एम एस काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर बारामती येथे आयोजित केलेल्या आंतर विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील खेळाडू प्रतीक जगताप याने ९७ किलो खालील वजन गटात व प्रकाश कार्ले याने ७४ किलो खालील वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीमुळे या खेळाडूंनी हरियाणा येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात स्थान मिळविले.
सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन या दोन्ही प्रकारात मिळून पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असे एकूण ४ विभागातील विविध महाविद्यालय शिक्षण घेणारे १६० कुस्तीगीर सहभागी झाले होते.
प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, सहाय्यक क्रीडा संचालक डॉ सुदाम शेळके, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती सचिव डॉ अमेय काळे, सहसचिव डॉ गणेश चव्हाण, खजिनदार डॉ सुहास बहिरट, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ बाळासाहेब मरगजे या मान्यवरांच्या हस्ते प्रतीक जगताप व प्रकाश कार्ले यांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.
सदर दैदिप्यमान कामगिरीबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले.
दोन्ही विजेते खेळाडू श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक तानाजी बोडरे व माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील, कुटुंबीय, माजी आमदार संजय जगताप, प्रशिक्षक, सहकारी मल्ल, क्रीडा संचालक यांना दिले आहे.