मराठवाडा शिक्षक संघाची मागणी
धाराशिव ः मराठवाड्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अतिवृष्टीने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मराठवाड्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अतिवृष्टीने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. शालांत माध्यमिक व उच्च प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२६ साठी आवेदनपत्र भरणे सुरू आहे. आस्मानी संकटात सर्वस्व गमावलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची परीक्षा फीस भरण्याची ऐपत शेतकऱ्यांमधे राहिलेली नाही. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला आता मदतीची गरज आहे. अशा कालखंडात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मराठवाड्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यास मदतीचा हात द्यावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, कोषाध्यक्ष ए बी औताडे, केंद्र कार्यकारणी सदस्य श्री फारुख जमादार व तीर्थकर सुशील कुमार, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, तालुकाध्यक्ष दराडे एस के, अरुण बोंदर, शहराध्यक्ष व्यंकटेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डी के भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष डी एम माळी, जिल्हा सहसचिव गीते जेपी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अण्णासाहेब कुरुलकर यांनी दिली आहे.