एमआयजी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अभिजित व रिंकी विजेते

  • By admin
  • September 30, 2025
  • 0
  • 69 Views
Spread the love

अभिजितने माजी विश्वविजेत्याला नमवले, रिंकीने तीन सेटची थरारक लढत जिंकली

मुंबई : एमआयजी क्रिकेट क्लब मुंबई येथे पार पडलेल्या तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याच्या अभिजित त्रिपनकर आणि मुंबईच्या रिंकी कुमारी यांनी विजेतेपदावर आपली छाप उमटवली.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अभिजित त्रिपनकरने माजी विश्वविजेता प्रशांत मोरेवर २५-२२, १९-१८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीतही त्याने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करून हरेश्वर बेतवंशीचा पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने ठाण्याच्या कुणाल राऊतवर तीन सेटमध्ये विजय मिळवला.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत मुंबईच्या रिंकी कुमारीने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरचा २४-७, १४-१९, २२-१९ असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने ठाण्याच्या चैताली सुवारेवर २५-९, २५-१६ अशी मात केली.

विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे अर्जुन पुरस्कार विजेते बिलियर्ड्स व स्नूकरपटू आदित्य मेहता तसेच विशेष अतिथी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांच्या हस्ते चषक व एकूण १ लाख १० हजार रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी एमआयजी जिमखान्याचे अध्यक्ष मिहीर बापट, कार्याध्यक्ष डॉ मोहन नागपूरकर, सचिव निशांत पाटणकर, इनडोअर सचिव निनाद बोरकर, क्रीडा समन्वयक केदार कलबाग, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी यतिन ठाकूर, अजित सावंत व अरुण केदार उपस्थित होते.

या स्पर्धेला सारस्वत बँक व एनकेजीएसबी यांचा पुरस्कार लाभला. अध्यक्ष डॉ बापट यांनी पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *