
रायगड ः रायगड जिल्ह्यातील महाड गावाची सुकन्या रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटातील महिलांच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू क्रिकेट खेळाडू रोशनी पारधी ही रायगडच्या क्रिकेट इतिहासातील पहिली महिला क्रिकेट खेळाडू आहे जिची निवड महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात करण्यात आली आहे.
अवघ्या सोळा वर्षाच्या रोशनीची निवड याआधी महाराष्ट्राच्या पंधरा, सतरा व एकोणीस वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात झाली होती. गतवर्षी झालेल्या आंतर जिल्हा पंधरा वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रोशनी पारधी हिने लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रोशनी ही जलदगती गोलंदाज व सलामीवीर फलंदाज म्हणून नावलौकिक संपादन केला आहे. तिने सातत्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघासाठी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या कनिष्ठ वयोगटाच्या संघात खेळतांना रोशनी हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अष्टपैलू क्रिकेट खेळाच्या जोरावर रोशनी हिने आजवर आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अनेक शतके ठोकली व अनेक फलंदाज बाद केले आहेत. रोशनी हिचे वडील रवींद्र पारधी, एसीबी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर व प्रशिक्षक आवेश चिचकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रोशनी हिची निवड महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रोशनी हिने केलेले कठोर परिश्रम, सरावा दरम्यानची शिस्त व सातत्याने केलेला उत्तम खेळामुळे तिच्या मेहनतीचे चीज झाल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनी तिचे पालक व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले असून रोशनी हिने कमी वयात उतुंग भरारी घेत रायगडचे नाव खऱ्या अर्थाने रोशन केले आहे. रायगड जिल्ह्यात मुलांच्या बरोबरीने मुलींमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाची गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण व त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आपण उपल्ब्ध करून देणार असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
भविष्यात रोशनी हिने देशासाठी खेळावे अशी इच्छा सर्वांची आहे त्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तिला लागेल ती मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी आरडीसीएच्या वतीने जाहीर करण्यात आले. रोशनी पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिन्याच्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आरडीसीएचे सर्व पदाधिकारी, सदस्य जिल्ह्यातील सर्व क्रिकेटप्रेमी लोकांनी तिचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.