
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
या स्पर्धेत ८०-८५ किलो वजन गटामध्ये प्रथमेश बेरड, ४७-५० किलो वजन गटामध्ये कृष्णा राउत व ४५-५० किलो वजन गटामध्ये मोनाली धनगर यांनी सुवर्ण पदक पटकावून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ६०-६५ किलो वजन गटामध्ये प्रशिक धुळे याने रौप्य पदक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.