
आंतर महाविद्यालयीन योग स्पर्धेचे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उद्घाटन
वाळूज : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्रीडा धोरणाला देखील विशेष महत्त्व असून त्याच्या केंद्रस्थानी विद्यार्थी असल्याचे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप यांनी केले.
विद्यापीठाच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गजानन सानप यांनी दिले. दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन योग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव विजय राऊत, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ सचिन देशमुख, योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, प्राचार्य डॉ राहुल हजारे, उपप्राचार्य डॉ युवराज धबडगे, डॉ संजय सांभाळकर इत्यादी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या १६ महाविद्यालय संघांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये ४० मुली आणि ३५ मुलांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठातर्फे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून अभिजीत दीख्खत हे उपस्थित होते तर योगा असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर, छाया मिरकर, बापू सोनवणे, डॉ माधवसिंग इंगळे आदींनी पंच म्हणून आपली भूमिका पार पाडली. यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे अखिल भारतीय पातळीवर होणाऱ्या योग स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ भरतसिंग सलामपुरे यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ सीमा मुंडे यांनी केले. डॉ अनुजा कंधारकर यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयीन क्रीडा संचालक डॉ विशाल देशपांडे, डॉ मधुकर वाकळे, डॉ महेशराजे निंबाळकर, डॉ सुहास यादव, डॉ बी बी सले, डॉ राहुल वावरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.