
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा नवा राष्ट्रीय विक्रम
ठाणे ः ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर दणदणीत यश मिळवत आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील सिटी बॅडमिंटन कोर्ट्स येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सिनियर रैंकिंगच्या प्रतिष्ठा पूर्ण स्पर्धेत दीप रांभिया आणि सोनाली मिरखेलकर या जोडीने मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावत दुहेरीच्या क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
दीप रांभिया हा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील १४वा शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू असून, गेल्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर सतत भारताचा क्रमांक १ खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. बालपणापासून अकॅडमीमध्ये सातत्याने प्रशिक्षण घेत असलेला दीप आज राष्ट्रीय दुहेरीच्या गटामध्ये आपले वर्चस्व टिकवून आहे. तर सोनाली मिरखेलकर हिने ही नव्याने तयार झालेली जोडी अल्पावधीतच सर्व प्रमुख अजिंक्यपदे जिंकत देशभरात चमकत आहे.
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश व्ही व प्रवंधिका यांना २१-१९, २१-१९ अशा सरळ दोन गेममध्ये हरवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दिव्यम अरोरा व लिखिता श्रीवास्तव या जोडीला २१-१७, २१-१५, २१-१८ अशा टप्प्याटप्प्याने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. निर्णायक अंतिम फेरीत दीप आणि सोनाली मिरखेलकर यांनी जबरदस्त जिद्द दाखवत ध्रुव रावत व मनीषा के यांना १८-२१, २१-१४, २१-१४ अशा सनसनाटी विजयाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
या यशामागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीचा आणि प्रशिक्षकांच्या अथक मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनीस, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, अमित गोडबोले, एकेंद्र दार्जी, प्रसन्नजीत शिरोडकर, फुलचंद पासी, ऋषिकेश जोगळेकर यांच्या मेहनतीमुळे खेळाडूंना ठाणे अकादमीच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोवता आला आहे.
“ठाण्याचे खेळाडू सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवत आहेत. मुलांच्या मेहनतीसोबत संपूर्ण प्रशिक्षक टीमचे सातत्यपूर्ण योगदान आणि पालकांचे सहकार्य हीसुद्धा या यशामागील मोठी ताकद आहे. आम्ही विश्वासाने सांगू शकतो की येणाऱ्या काळात ठाण्याचे खेळाडू अजून मोठ्या व्यासपीठावर नक्कीच झळकतील,” असे अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी सांगितले.
या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल ठाणे महानगरपालिका क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी सय्यद मोदी अकॅडमी च्या संपूर्ण संघाचे अभिनंदन केले असून भविष्यात आणखी मोठ्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.