
नागपूर ः नागपूर येथील रवीभवन येथे शालेय शिक्षण राज्य मंत्री डॉ पंकज भोयर महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत सर्व शिक्षक संघटनांची टीईटी व अन्य विषयावर सभा संपन्न झाली.
सर्व संघटनांनी मांडलेल्या मुद्यांचा स्वीकार करत मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करून या ठिकाणी शासनाचे मत व्यक्त करत आहोत, असे सांगत राज्य शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू याचिका लवकरच दाखल करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू करत आहोत असे आश्वासन दिले. त्यानंतर सभा घेऊन संघटनेच्या वतीने १८ ऑक्टोबर पर्यंतचा अवधी शासनाला देण्याचे संघटनांनी ठरवले. या कालावधीत हालचाल न झाल्यास ८ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा आंदोलन करण्यात येईल असे ठरवण्यात आले. तोवर राज्यातील पूरपरिस्थिती व झालेले नुकसान पाहता मोर्चा करू नये असे आवाहन राज्य मंत्री पंकज भोयर यांनी संघटनांना केले. त्याला प्रतिसाद देत ४ ऑक्टोबर रोजीचा मोर्चा संस्थगित करत आहोत असे संघटनेने जाहीर केले.
यासोबतच १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची संमती देऊन शिक्षण सेवक, अनुकंपा, बीएलओ व अन्य विषयावर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली व याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
एकंदरीत आजची सभा व चर्चा यशस्वी झाली.या सभेला महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, नागपूर विभागीय अध्यक्ष सुनील ठाणेकर, नागपूर शहर सचिव अरविंद पांडे तसेच इतर सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित होते.