
महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
मुंबई ः भारतीय संघाचे तिसऱ्या ज्युनिअर आशियाई पिंच्याक सिलॅट स्पर्धेत ७ सुवर्ण १८ रौप्य व २६ कांस्य अशी एकूण ५१ पदके मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन केले.
जम्मू काश्मीर येथील शेरे काश्मीर इनडोअर स्टेडियम येथे तिसऱ्या ज्युनियर आशियाई पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन भारतीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), जम्मू-काश्मीर क्रीडा परिषद यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने तसेच एशियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मान्यतेने भारतीय पिंच्याक सिलॅट फेडरेशनने केले होते.
या स्पर्धेमध्ये भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स,व्हिएतनाम, कजाकिस्तान, उझबेकिस्तान, थायलंड, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या ११ देशातील ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत भारतीय संघाने ७ सुवर्ण, १८ रौप्य आणि २६ कांस्य पदके मिळवून चौथ्या क्रमांकाचा चषक पटकावला.
पहिल्या स्थानी ८ सुवर्ण, ३ रौप्य, ६ कांस्य पदके मिळवून व्हिएतनाम संघ राहिला. तसेच अनुक्रमे फिलिपिन्स ८ सुवर्ण, १ रौप्य, ६ कांस्य, इंडोनेशिया ८ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य या संघांनी पदके मिळून सांघिक चषक पटकावला.
भारतीय संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंनी रौप्य पदक पटकावले. त्यात श्रावणी हिरवे, पुनम सिंग, वैष्णवी कचरे यांचा समावेश आहे. तसेच अनिश पालकर आणि नेहा ढोरे यांनी कांस्य पदक संपादन केले.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, मुख्य सचिव अतुल दुल, क्रीडा मंत्री सतीश शर्मा आणि इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आनंद जैन, जम्मू काश्मीर स्पोर्ट कौन्सिलचे सचिव नजत गुल, किशोर येवले, मोहम्मद इकबाल आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.