
छत्रपती संभाजीनगर ः युवा पिढीमध्ये बॉक्सिंगसारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पीईएस कॉलेजमध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ‘द अनबिटेबल बॉक्सिंग अकॅडमी’ची स्थापना करण्यात आली.
सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या बॉक्सिंग अकॅडमीचे उद्घाटन बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी हे होते. यावेळी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सोनू टाक, बॅडमिंटन प्रशिक्षक चेतन तायडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ निलेश आंबेवाडीकर आणि कुस्ती प्रशिक्षक प्रा मंगेश डोंगरे हे मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पंकज भारसाखळे यांनी सांगितले की, “बॉक्सिंग हा खेळ केवळ करिअर नाही तर आत्मरक्षणाचे प्रभावी साधन देखील आहे. आजच्या युगात तरुणांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. या खेळातून भविष्यात करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणून अधिकाधिक युवक-युवतींनी या खेळाकडे वळावे.” त्यांनी हेही जाहीर केले की, लवकरच या अकॅडमीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, “आजच्या तरुणांमध्ये बॉक्सिंगबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र योग्य सुविधा आणि संधींचा अभाव तसेच आर्थिक मर्यादा यामुळे अनेक खेळाडू मागे पडतात. त्या पार्श्वभूमीवर आमच्या महाविद्यालयात ‘द अनबिटेबल बॉक्सिंग अकॅडमी’ सुरू करण्यात आली आहे. ही अकॅडमी ‘न नफा, न तोटा’ या संकल्पनेवर आधारित असून मुलींना ५० टक्के फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच गरजू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस अकॅडमीचे संचालक व राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू सुरज बचके यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात अकॅडमीतील खेळाडूंनी बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थिताना या खेळाचे महत्त्व पटवून दिले. खेळाडूंच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.