
शिर्डी ः स्केटिंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ४५ वी ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप (आंतरराष्ट्रीय निवड स्पर्धा) येत्या ५ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील साई पालखी मैदानावर भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक सचिव भिकन अंबे यांनी दिली आहे.
या स्पर्धेत देशभरातून नामवंत स्केटर्स सहभागी होणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना संधी मिळवून देणारी ही स्पर्धा ठरणार आहे. सहभागींचे रिपोर्टिंग ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होणार आहे. यानंतर रिले-१ आणि स्पीड रेस या रोमांचक स्पर्धा रंगणार आहेत.
सर्व स्केटर्सना प्रमाणपत्रे आणि मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, प्रशिक्षकांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात येईल. त्यांना टी-शर्ट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याशिवाय, या स्पर्धेतून निवड झालेले स्केटर्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
आयोजक समितीने सर्व स्केटर्स व प्रशिक्षकांचे शिर्डीत मनःपूर्वक स्वागत केले असून, स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी ही क्रीडा पर्वणी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास सचिव भिकन अंबे यांनी व्यक्त केला आहे.