
पुणे – क्रीडा क्षेत्रातील अध्वर्यू म्हणून लौकिकास आलेले प्राध्यापक नानासाहेब फटाले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. २ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेले फटाले सर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शांत, सात्विक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या नानासाहेबांचे शालेय शिक्षण एनएमव्ही येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण वाडिया कॉलेजमध्ये झाले. शारीरिक शिक्षणात त्यांनी कांदिवली येथून पदव्युत्तर पदवी मिळवली. घरातील परंपरेप्रमाणेच कुस्तीची तालीम घेताना आजोबा सोन्याबापू पगडीवाले व वडील शामराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लाल मातीशी इमान राखत खेळाडू वृत्ती जोपासली.
“लाल मातीशी इमान, तोच खरा पैलवान” हे त्यांचे जीवनसूत्र होते.कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव अशा विविध स्पर्धांमध्ये पुणे विद्यापीठाचे नाव त्यांनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पातळीवर उज्ज्वल केले. ‘पुणे श्री’ हा किताबही त्यांनी मिळवला होता. शाहू कॉलेज, रुपारेल कॉलेज, एमईएस कॉलेज व नेस वाडिया कॉलेज येथे क्रीडा संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ते पुणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन व पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. महाविद्यालयीन सेवेत असताना ते एनसीसी ऑफिसर राहून मेजर पदावर निवृत्त झाले. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व मॉडर्न बॉडी बिल्डिंग या पुस्तकाचे सहलेखन करून त्यांनी क्रीडा साहित्यात देखील योगदान दिले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शक्ति जिम्नॅशियममध्ये १८ वर्षे व्यायामाचे धडे देत नवे खेळाडू घडविले.त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना चिंतामणी जीवन गौरव पुरस्कार, स्व भाई नेवरेकर जीवन गौरव पुरस्कार तसेच क्रीडा महर्षी हरिभाऊ साने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रीडा संस्कार, शिस्त, सात्विकता आणि आंतरबाह्य सुंदर व्यक्तिमत्त्व यामुळेच ते अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. खरंच – “झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच असे नानासाहेब.”