
नागपूर ः रणजी चषक विजेत्या विदर्भ संघाने इराणी ट्रॉफी स्पर्धेत दुसऱ्या दिवसअखेर २२४ धावांची आघाडी घेऊन सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
विदर्भ संघाने दुसऱ्या डावात ३६ षटकांच्या खेळात दोन बाद ९६ धावा काढल्या आहेत. अथर्व तायडे (१५) व अमन मोखाडे (३७) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. त्यानंतर ध्रुव शोरी (२४) व दानिश मालेवार (१६) या जोडीने शेष भारत संघाला आणखी विकेट मिळू दिली नाही. दोन बाद ९६ या धावसंख्येसह विदर्भ संघाने २२४ धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, शेष भारत संघाचा पहिला डाव २१४ धावांत गुंडाळून विदर्भ संघाने सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली. शेष भारत संघाकडून अभिमन्यू ईश्वरन (५२), रजत पाटीदार (६६) यांचा अपवाद वगळता सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्याचा फटका संघाला बसला. विदर्भ संघाकडून यश ठाकूर याने ६६ धावांत चार विकेट घेऊन संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. पार्थ रेखाडे (२-२४), हर्ष दुबे (२-५८), आदित्य ठाकरे (१-४०), दर्शन नळकांडे (१-२६) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.