
पुणे ः खराडी पुणे येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा केला.
दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी भारतभर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएस फाउंडेशन डे साजरा केला जातो. १९६९ मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एनएसएसची स्थापना करण्यात आली. या योजनेचा उद्देश म्हणजे तरुण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवावृत्ती ,व्यक्तिमत्व विकास व राष्ट्रप्रेम जागृत करणे. “नॉट मी बट यू” हे एनएसएसचे ब्रीदवाक्य आहे. ज्यातून स्वतःपेक्षा समाज मोठा हा संदेश दिला जातो.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वडकी येथील गंगातारा वृद्धाश्रम व अनाथ आश्रम ला भेट दिली. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व एनएसएस गीताने व शस्त्र पूजनाने आणि जलार्पण करून करण्यात आली.
प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे यांनी एनएसएस स्थापनेचा इतिहास उद्दिष्टे व “नॉट मी बट यू” या ब्रीदवाक्याचे महत्त्व सांगत समाजकार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग का आवश्यक आहे हे स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने जीवनावश्यक वस्तू,ब्लँकेट्स अशा आवश्यक वस्तू भेट दिल्या. आश्रम परिसरात फळझाडे व औषधी झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला तसेच परिसरातील प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांचे अनुभव व व्यथा ऐकल्या. त्यामुळे वृद्धांना मानसिक दिलासा मिळाला, तर विद्यार्थ्यांना मानवी मूल्यांची आणि संवेदनशिलतेची जाणीव झाली.कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस अधिकारी प्रा प्रगती मासाळकर यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ अश्विनी बनकर, प्रा ज्योती दारकुंडे, प्रा ऐश्वर्या निचळ, ग्रंथालय विभाग प्रमुख कांचन बुचडे, अरुणा चिगरे, जयंत पिसे, जे डी पठारे, सागर पठारे आदी उपस्थित होते.