
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत भागीरथी विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत विद्यालयाच्या तीन मल्लांनी सहभाग नोंदवला. त्यात १७ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजन गटात रितू सोनवणे हिने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्णपदक जिंकले. तिच्या या दमदार कामगिरीमुळे तिची विभागीय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय १९ वर्षे वयोगटातील ६१ किलो वजन गटात सूर्या कानडे याने अटीतटीची लढत देत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आणि रौप्यपदकाचा मानकरी ठरला. या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक भरत निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मीकराव सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, कोषाध्यक्ष विशालजी सुरासे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, कुस्ती कोच शरद कचरे, तालुका क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, प्राचार्य बी एम हजारे, प्रमोद पठारे, दत्तात्रय सुरासे, सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप तसेच संस्थेचे मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ग्रामस्थ, मान्यवर आणि उपस्थितांनी रितू सोनवणे व सूर्या कानडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय स्तरावरही उज्ज्वल यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या.