
सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर नाव कोरले
ठाणे (समीर परब) ः ठाणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल, सावरकर नगर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एस एम एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ठाणेच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपद पटकावले.
संघातील खेळाडूंमध्ये कॅप्टन सानिका म्हात्रे हिने नेतृत्व करताना शमिका माने, अपूर्वा देशमुख, नुपूर भोईर, तन्वी सुर्वे, साक्षी पवार, देविका जाधव, तनिष्का कदम, कार्तिकी राणे व दिव्या पटेल यांनी दमदार खेळ सादर केला. त्यांच्या खेळातील एकजूट व जिद्दीमुळे संपूर्ण ठाण्यात कौतुकाची लाट उसळली आहे.
अंतिम सामन्यात ज्ञानसाधना महाविद्यालय व श्री मावळी मंडळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यात चुरशीची लढत रंगली. एस एम एम हायस्कूलच्या मुलींनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संघाला क्रीडा प्रशिक्षक प्रमोद वाघमोडे व कबड्डी प्रशिक्षक सागर शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या समर्पित प्रयत्नांबद्दल खेळाडू व पालक वर्गाने कृतज्ञता व्यक्त केली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक, संस्था, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या एस एम एम हायस्कूलच्या मुलींनी ठाण्यात आपले वर्चस्व ठळकपणे सिद्ध केले आहे.