
अनुजा पाटील कर्णधार, मुक्ता मगरे उपकर्णधार
पुणे ः नागपूर येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या वरिष्ठ महिला टी २० करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुजा पाटीलची कर्णधार आणि मुक्ता मगरेची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद सचिव अॅड कमलेश पिसाळ यांच्यामार्फत, ८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे सुरू होणाऱ्या बीसीसीआय सीनियर महिला टी २० ट्रॉफी २०२५-२६ “एलिट बी” गट लीग सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र सीनियर महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, सहसचिव संतोष बोबडे, राजू काणे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ सात सामने खेळणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडू संघाशी होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र संघ मध्य प्रदेश (९ ऑक्टोबर), पाँडिचेरी (११ ऑक्टोबर), राजस्थान (१३ ऑक्टोबर), बंगाल (१५ ऑक्टोबर), पंजाब (१७ ऑक्टोबर), सौराष्ट्र (१९ ऑक्टोबर) या संघांविरुद्ध खेळणार आहे. हे सर्व सामने नागपूर शहरातील लेडी अमृतबाई डागा कॉलेज ग्राउंड या ठिकाणी होणार आहेत.
महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघ
अनुजा पाटील (कर्णधार), मुक्ता मगरे (उपकर्णधार), खुशी मुल्ला, भक्ती मिरजकर, इशिता खळे, ज्ञानेश्वरी पाटील, ईशा पठारे, रोशनी पारधी, भाविका अहिरे, शिवाली शिंदे, श्वेता सावंत, तेजल हसबनीस, श्वेता माने, गौतमी नाईक, किरण नवगिरे, ईश्वरी सावकर.