
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः शतकवीर आकाश विश्वकर्मा, सलीम पठाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये मायटी ग्लॅडिएटर्स आणि इथिकल क्रिकेट अकादमी या संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली. या लढतींमध्ये आकाश विश्वकर्मा आणि सलीम पठाण यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.
रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात मायटी ग्लॅडिएटर्स संघाने १३७ धावांनी सामना जिंकला. मायटी ग्लॅडिएटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात दोन बाद २४६ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमई क्रिकेट अकादमीचा संघ १७.३ षटकात १०९ धावांत सर्वबाद झाला.

या सामन्यात आकाश विश्वकर्मा याने तुफानी शतक ठोकले. आकाशने अवघ्या ५५ चेंडूत १०० धावांची वादळी खेळी केली. त्याने सात उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. कार्तिक बाकलीवाल याने ३७ चेंडूत ६८ धावांची वेगवान अर्धशतकी खेळी केली. त्याने सहा टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. आकाश अभंग याने २७ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व सहा चौकार मारले. गोलंदाजीत अनिकेत पाडळकर याने २४ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. झमीर याने ९ धावांत दोन तर विजय भिवसने याने २८ धावांत दोन गडी बाद केले.
एमके डेव्हलपर्स संघ पराभूत
दुसरा सामना इथिकल क्रिकेट अकादमी संघाने सात विकेट राखून जिंकला. इथिकल अकादमीने एमके डेव्हलपर्स संघाचा डाव १२.५ षटकात अवघ्या ६६ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी करुन १०.५ षटकात तीन बाद ६७ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात मुनीर गाझी (३१), साहिल तडवी (२७), हरिओम काळे (२१) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत सलीम पठाण याने १४ धावांत चार विकेट घेऊन संघाला मोठा विजय मिळवून दिला आणि सामनावीर पुरस्कार संपादन केला. मयूर वैष्णव याने ६ धावांत तीन बळी टिपले. अन्सारी अझर अहमद याने १५ धावांत तीन गडी बाद केले.