
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कोकण कप विनाशुल्क निवड चाचणीच्या शालेय मुलींच्या कॅरम स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवीने विजेतेपद तर व्ही एन सुळे गुरुजी शाळा-दादरची ग्रीष्मा धामणकरने उपविजेतेपद पटकाविले.
चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये पाचव्या बोर्डपर्यंत ८-८ अशा बरोबरीत रंगलेल्या सामन्यात तनया दळवीने ग्रीष्मा धामणकरला १०-८ असे चकविले. विजेत्यांना क्रीडाप्रेमी प्रमोद पार्टे, चंद्रकांत करंगुटकर, अविनाश महाडिक, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत शालेय मुलींच्या उपांत्य सामन्यात ग्रीष्मा धामणकरने कनोसा हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरचा १७-२ असा तर तनया दळवीने महिंद्र अकॅडमी स्कूलच्या श्रिया पवारचा २५-० असा पराभव केला. दादर-पश्चिम येथील सिबिईयुएम सभागृहात शालेय मुलांच्या तिसऱ्या फेरीमधील सामन्यात जैतापूरच्या आर्यन राऊतने विराज बर्वेचा , प्रसन्न गोळेने ओमकार लोखंडेचा, तीर्थ ठक्करने सुशांत कदमचा , पुष्कर गोळेने शंभू धुरीचा , उमैर पठाणने मन्न भलालाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.