
एमसीए अंडर १५ महिला क्रिकेट
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १५ मुलींच्या एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेला सोमवारी शानदार प्रारंभ झाला. यात जालना महिला संघाने विलास स्पोर्ट्स क्लबचा सात विकेट राखून पराभव करत विजयी सलामी दिली. आक्रमक शतक साजरी करणारी संस्कृती घोरतळे ही सामनावीर ठरली.
या सामन्यात विलास स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३५ षटकात सर्वबाद २०० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जालना महिला संघाने दमदार फलंदाजी करत ३१.२ षटकात तीन बाद २०१ धावा फटकावत सात विकेट राखून शानदार विजय साकारला.
या सामन्यात जालन्याच्या संस्कृती घोरतळे हिने तुफानी शतक साजरे केले. तिने ८८ चेंडूंचा सामना करत १०५ धावांची दमदार खेळी साकारली. तिने शतकी खेळीत १४ चौकार मारले. स्वरा गाडे हिने ५९ चेंडूंत ६३ धावा फटकावल्या. तिने १२ चौकार मारले. आरोही अहेर हिने सात चौकरांसह ४१ धावा काढल्या. गोलंदाजीत मानिनी वायाळ (२-२६), संजना म्हस्के (२-४७), श्रुतिका पाटील (२-४९) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले. जालना महिला संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.