
ताझमिन ब्रिट्सचे विक्रमी शतक, लुसेसोबत १५९ धावांची भागीदारी निर्णायक
गुवाहाटी ः ताझमीन ब्रिट्सचे धमाकेदार शतक (१०१) आणि सुने सुस (नाबाद ८३) यांच्या १५९ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंड संघाचा सहा विकेट राखून पराभव करुन महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. एका कॅलेंडर वर्षात पाच शतक ठोकणारी ब्रिट्स ही पहिली खेळाडू ठरली आहे. हा एक विश्वविक्रम आहे.
पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ६९ धावांत गडगडला होता. या धक्कादायक कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात फलंदाजीत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कर्णधार लॉरा वोल्वार्ड १४ धावांवर बाद झाली. त्यानंतर ताझमीन ब्रिट्स आणि सुने लुस या जोडीने दुसऱया विकेटसाठी १७० चेंडूत १५९ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित झाला.
ताझमीन ब्रिट्स हिने ८९ चेंडूत १०१ धावांची शानदार खेळी केली. तिने १५ चौकार व १ षटकार मारला. सुने लुस हिने अप्रतिम अर्धशतक साजरे केले. अमेलिया केर हिने मॅरिझॅन कॅप (१४), अॅनेके बॉश (०) यांना बाद करुन सामन्यात थोडी रंजकता आणली. मात्र, सुने लुस हिने १० चौकारांसह नाबाद ८३ धावा फटकावत संघाच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. आफ्रिकेने ४०.५ षटकात चार बाद २३४ धावा काढून सहा विकेटने हा सामना जिंकला.
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सातवा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंडच्या कर्णधार सोफी डेव्हाईनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. किवी स्टार फलंदाज सुझी बेट्स डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज मॅरिझाने कॅपने तिला एलबीडब्ल्यू केले. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या संघाने विकेट गमावण्याची ही दुसरी वेळ आहे.
२०२२ मध्ये पहिल्यांदाच असे घडले. यापूर्वी २०२२ मध्ये हा पराक्रम घडला होता. पाकिस्तानच्या नाहिदा खानला कॅथरीन सीवर ब्रंट हिने बाद केले होते. आता, २०२५ च्या विश्वचषकात दुसऱ्यांदा हा पराक्रम झाला आहे. सुझी बेट्स हिला तिचे खाते न उघडता सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद करण्यात आले. या विश्वचषकात तिचा हा दुसरा डक आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धही ती डकवर बाद झाली होती. या विश्वचषकात तिला अद्याप तिचे खाते उघडता आलेले नाही. मागील नऊ एकदिवसीय सामन्यांमध्ये सुझी बेट्सची ही सहावी एक-अंकी धावसंख्या आहे. उर्वरित तीन डावांमध्ये तिने पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.