
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचा झेंडा उंचावला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीतून त्यांच्या क्रीडानिष्ठा, शिस्त आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचा उत्कृष्ट प्रत्यय आला आहे.
श्रेया लोंढेची पाच सुवर्णपदकांची कमाल
रिदमिक जिम्नॅस्टिक्स या स्पर्धेत श्रेया लोंढे हिने अविस्मरणीय कामगिरी करत हूप, बॉल, क्लब्स, रिबन आणि ऑल-राऊंड अशा पाच प्रकारांमध्ये सुवर्णपदके पटकावली. तिच्या सादरीकरणातील अचूक हालचाली, लवचिकता आणि आकर्षक अभिव्यक्तीमुळे तिला परीक्षक आणि प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली.
जलतरणात आर्यन निर्मल आणि साईराज तालीमकर यांची चमक
जलतरण स्पर्धेत स्पर्धांमध्ये आर्यन निर्मल याने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकत आपला दबदबा सिद्ध केला. त्याचबरोबर साईराज तालीमकर याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक आणि २०० मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये कांस्यपदक मिळवून संघाच्या यशात भर घातली.या उल्लेखनीय यशामुळे एमआयटी संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या कटिबद्धतेचे पुनरुज्जीवन झाले आहे. विद्यार्थ्यांना डॉ प्रसाद कुलकर्णी, संचालक (शारीरिक शिक्षण विभाग, एमआयटी सीएसएन) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी प्रा मुनीश शर्मा (महासंचालक, एमआयटी सीएसएन, डॉ निलेश पाटील (संचालक, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), डॉ बाबासाहेब सोनवणे (रजिस्ट्रार), डॉ अमित रावते आणि डॉ. हनुमंत धर्माधिकारी, विलास त्रिभुवन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल डॉ प्रसाद कुलकर्णी म्हणाले, “विद्यार्थ्यांची ही कामगिरी त्यांच्या मेहनती, शिस्तबद्धतेचे आणि संस्थेच्या क्रीडा विकासासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. एमआयटीमध्ये आम्ही केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही, तर क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासावरही तितकेच लक्ष केंद्रित करतो.”संस्थेच्या व्यवस्थापनाने आणि सर्व कर्मचारीवर्गाने या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच यशस्वी कामगिरी व्हावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.