
छत्रपती संभाजीनगर ः आंतर शालेय विभागीय शुटींग एअर पिस्तूल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची नेमबाज ईशा शीलवंत हिने सुवर्ण कामगिरी बजावली आहे.
अजंठा रायफल शूटिंग क्लब, यशवंत कला महाविद्यालय कॅम्पस, गारखेडा परिसर येथे झालेल्या आंतरशालेय १९ वर्षांखालील विभागीय शूटिंग स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची खेळाडू ईशा दीपक शीलवंत हिने एअर पिस्तूल प्रकारात ३६५ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ईशा हिची राज्यस्तरीय आंतरशालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कामगिरीमुळे महाविद्यालयाचा आणि संस्थेचा नावलौकिक वाढला आहे.
या सुवर्ण यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळ सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर हिवरे आणि उपप्राचार्य प्रा विजय नलावडे यांनी ईशा हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
देवगिरी महाविद्यालयाच्या या कामगिरीमुळे संस्थेच्या क्रीडा परंपरेत एक नवा सुवर्ण अध्याय जोडला गेला असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ईशा उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार यांचे मार्गदर्शन तसेच प्रा मंगल शिंदे, प्रा अमोल पगारे, प्रा शुभम गवळी, प्रा कृष्णा दाभाडे आणि प्रा शेख शफीक यांचे सहकार्य लाभले आहे.