खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते –  रोहित पवार

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 62 Views
Spread the love

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे शानदार उद्घाटन

जळगाव : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही. त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळातील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देश हित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला.

अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन रोहित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस टी खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा व पदाधिकारी, निवड कमिटीचे सदस्य संजय पवार, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी होते. अशोक जैन व  अतुल जैन यांनी रोहित पवार यांचा सत्कार केला.

सुरवातीला सीआयएससीई बोर्डचा ध्वज प्राचार्य देबाशीष दास यांनी फडकाविला. ‘चले चलो…’ हे स्वागत गीत अनुभूती निवासी स्कूल मधील विद्यार्थींनी सादर केले. कलाकृतींचे प्रदर्शन ही विद्यार्थ्यांनी केले. ‘उठा के बल्ला कर दे हल्ला..’ या गीतावर सामूहिक प्रस्तूती सादर केली. त्यानंतर सर्व संघांनी मिळून मार्च पास करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आमदार रोहित पवार यांच्याकडून तायक्वांदो स्पर्धेतील रौप्य पदक विजेती खेळाडू पलक सुराणा हिने मशाल घेतली. त्यानंतर मशाल रन झाली. राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अन्मय जैन याने क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. सुयश बुरकूल यांनी खेळाडूंना शपथ दिली.

यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले की, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि माझे आजोबा मित्र होते, मोठ्या भाऊंनी संशोधनातून शेतीपूरक साहित्य पोहचवून परिवर्तन घडविले. मायक्रो इरिगेशनमध्ये जैन जगातील अग्रक्रमांकाची कंपनी बनली. प्रत्येका समोर आव्हाने येत असतात, मात्र त्या आव्हानांतून मार्गही निघतो. जीवनात आलेल्या अडचणींवर खेळभावनेतून मात करता येते ही सकारात्मक भावना ठेऊन प्रत्येक संघाने आपले सर्वाेत्तम योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहे. या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश-तेलंगणा, कर्नाटक-गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू- पोर्ट बेअर- अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिशा, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, बिहार-झारखंड, केरळ, दुबई आंतरराष्ट्रीय संघ असे मिळून १३ संघांतील २६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *