
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शालेय क्रीडा क्षेत्रात कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव शाळेने सलग यश मिळवून आपल्या कबड्डी संघाची छाप कायम ठेवली आहे. संस्कृती ग्लोबल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हरसव सांगवी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत या शाळेच्या खेळाडूंनी १७ आणि १९ या दोन्ही वयोगटात प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी मुकुट जिंकला.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम आणि १९ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून या शाळेने स्पर्धा गाजवली. या यशामुळे पाटेगाव शाळेचे खेळाडू आगामी विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, डॉ माणिक राठोड, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रेखा परदेशी, तसेच तालुका समन्वयक, शाळेचे क्रीडा शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.
विजयी खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रा चंद्रकांत गायकवाड, प्रा ज्ञानदेव मुळे, जिल्हा असोसिएशनचे सचिव डॉ युवराज राठोड, उपाध्यक्ष आप्पासाहेब लघाणे, बाळासाहेब सारूक, ज्ञानेश्वर सोनवणे, कैलास वाघमारे, सचिव वाल्मिकराव सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, कोषाध्यक्ष विशाल सुरासे, तालुका क्रीडा अधिकारी मुकुंजी वाडकर, तालुका क्रीडा मार्गदर्शक डॉ सोमनाथ टाक, महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश गायकवाड, तसेच क्रीडा शिक्षक व सहशिक्षकांनी सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंच्या धैर्य, संघभावना आणि कष्ट यामुळेच हा सुवर्णपरिणाम मिळाला असून, शाळेच्या कबड्डी संघाने आपल्या यशाची परंपरा पुढील वर्षांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.
या यशामुळे शाळेतील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह भरला आहे, तर पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासनात आनंदाची लहर पाहायला मिळाली. आगामी विभागीय स्पर्धेत पाटेगाव शाळेच्या संघाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.