नदी ही जीवनदायिनी – राज्य जलतरण साक्षरता दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

अंबेलोहळ येथे जनजागृतीचा अनोखा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर ः “नदी ही जीवनदायिनी आहे. पण तीच दुर्लक्षामुळे जीवघेणी ठरू नये” हा संदेश देत राज्य जलतरण साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन, ग्रामपंचायत अंबेलोहळ, आणि जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

जल हे जीवन, पण जागरूकता अत्यावश्यक

राज्यात ५ ऑक्टोबरपासून “जागर जलतरण साक्षरतेचा” हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे. या अभियानाचा उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या परिसरातील धोकादायक जलस्त्रोतांची माहिती देणे, जेणेकरून सुट्ट्यांमध्ये गावाकडे, सहलींवर किंवा निसर्गभ्रमंतीदरम्यान ते निष्काळजीपणे पाण्यात जाण्याचे टाळतील.

जलसुरक्षेची सवय लावणे आणि पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे. “जलतरण शिकणे म्हणजे केवळ खेळ नाही, तर जीवन वाचविण्याचे कौशल्य आहे” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 नागझरी नदीत प्रत्यक्ष शिक्षण

या उपक्रमाच्या अनुषंगाने अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांना गावातील नागझरी नदीवर नेऊन प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
विद्यार्थ्यांना नदीची प्रणाली, उगमस्थान, प्रवाह, खोली, रुंदी, तसेच बंधाऱ्यांची स्थिती यांची माहिती देण्यात आली. नदी कशी जिवंत राहते, तिचा प्रवाह कसा बदलतो, तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीतील धोके याचे प्रत्यक्ष निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले.

त्याचबरोबर स्थानिक शिक्षक आणि जलतरण साक्षरता मार्गदर्शकांनी नदीतील पाण्याची वेगवेगळी पातळी, भोवरे, तळातील चिखल, आणि दगडांमुळे होणारे संभाव्य अपघात याबाबत माहिती दिली.


सहभागींची प्रेरणादायी मतेअनिता व्याहाळकर म्हणाल्या, “भोसले सरांनी मला जलतरण साक्षरतेबद्दल माहिती दिली, तेव्हापासून मी पोहणे शिकण्याचा निर्धार केला आहे. आता ही माझ्यासाठी जीवनकौशल्य ठरणार आहे.”

मनीषा भंडारी म्हणाल्या, “या मोहिमेचा भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. ही साक्षरता मोहिम भविष्यात जागतिक स्तरावर ओळख मिळवेल, याची खात्री आहे.

मंजूषा कुलकर्णी म्हणाल्या, “मी चांगली धावक आहे, पण आता जलतरणातही प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या मोहिमेत सक्रिय राहणे ही माझी जबाबदारी आहे.”

दुर्गा चव्हाण यांनी सांगितले, “मी लहानपणी पोहायला शिकले, पण आता या साक्षरतेच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचतील. अशा जनहिताच्या मोहिमेत सहभागी राहणे हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे.”

शरद जाधव, मल्टीस्किल विभाग प्रमुख, म्हणाले, “जीवनकौशल्य वाढविणाऱ्या या अभियानात आणखी एक मौल्यवान कौशल्य — जलतरण साक्षरता — जोडली जात आहे. याचा मला अभिमान आहे.”

गोपालकृष्ण नवले, संघटक, जलतरण साक्षरता समिती महाराष्ट्र राज्य, म्हणाले, “हे अभियान राज्यभर पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला जलसुरक्षेबद्दल जागरूक करणे हे माझे कर्तव्य आहे.”

मुख्याध्यापक आर. आर. दुम्मलवार यांनी या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य आणि शालेय स्तरावर सातत्याने जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.

 विद्यार्थ्यांनी घेतली ‘जलसुरक्षा शपथ’

कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन जलतरण साक्षरता अभियान प्रमुख राजेश भोसले यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पाण्यापासून सुरक्षित राहण्याची “जलसुरक्षा शपथ” दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात या जनजागृती मोहिमेला गती देण्याचा आणि गावोगावी जलसाक्षरतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला.

भविष्यातील मोठे ध्येय – जलतरण साक्षर महाराष्ट्र

या उपक्रमातून केवळ जलतरण शिकवणे नव्हे, तर जलाशी संबंधित सर्वांगीण साक्षरता वाढविणे हे उद्दिष्ट आहे. अशा जनहिताच्या उपक्रमांमुळे “प्रत्येक नागरिक जलसाक्षर – प्रत्येक विद्यार्थी जलसुरक्षित” हे ध्येय साकार होईल, असा विश्वास आयोजक राजेश भोसले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *