
सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख, तेजस माळी पंच, मयुरी खरात खेळाडू म्हणून निवड
मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील पोलीस तायक्वांदो स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा लौकिक वाढवणारी अभिमानास्पद कामगिरी घडली आहे. पोलीस हेडक्वार्टर जम्मू-काश्मीर, श्रीनगर, भारत सरकारचे क्रीडा मंत्रालय आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पोलो ग्राउंड, श्रीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस गेम्स तायक्वांदो स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख म्हणून निवड झाली आहे.
सुभाष पाटील हे आंतरराष्ट्रीय पंच, ७ डिग्री ब्लॅक बेल्ट धारक असून तायक्वॉंडो खेळातील त्यांच्या दीर्घ, निस्वार्थी आणि समर्पित योगदानाची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांनी देश-विदेशात पंच व प्रशिक्षक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे पोलीस खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेसाठी रायगडचाच आणखी एक अभिमान, १२ वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता तेजस माळी याची राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे. तसेच नवी मुंबई पोलिस दलातील तायक्वांदोपटू मयुरी खरात हिची स्पर्धक खेळाडू म्हणून निवड झाली असून, ती गेल्या १५ ते १७ वर्षांपासून सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
या तिन्ही निवडीबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) यांच्यावतीने पदाधिकारी व प्रशिक्षकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत दादा पाटील व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
या गौरवशाली निवडीमुळे रायगड जिल्ह्याच्या तायक्वांदो क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.