रितेश केरेची गोल्डन हॅटट्रिक

  • By admin
  • October 7, 2025
  • 0
  • 44 Views
Spread the love

दिव्यांग जलतरणपटूचा राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण धमाका

छत्रपती संभाजीनगर : अंध असूनही आपल्या जिद्दीच्या बळावर राज्यस्तरीय पातळीवर सुवर्णयश संपादन करणारा रितेश राजेंद्र केरे हा युवक आज सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा हा विद्यार्थी १७व्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदकांसह विजेता ठरला.

ही स्पर्धा ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ जलतरण तलावावर पार पडली. राज्यभरातील १२५ हून अधिक दिव्यांग जलतरणपटूंनी यात सहभाग घेतला होता. त्यात रितेशने सिनिअर गटात विविध प्रकारांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.  १०० मीटर बॅकस्ट्रोक (१.३०.९४ सेकंद), १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (१.३२.४१ सेकंद) आणि  २०० मीटर वैयक्तिक मेडली (३.२१.२८ सेकंद) या प्रकारांत रितेश केरे याने  सुरेख कामगिरी बजावत सुवर्णपदक जिंकले. या तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण मिळवत रितेशने गोल्डन हॅटट्रिक पूर्ण केली.

विशेष म्हणजे, रितेश हा महाराष्ट्रातील पहिला अंध जलतरणपटू असून त्याची निवड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई), गांधीनगर, गुजरात येथे प्रशिक्षणासाठी झाली आहे. तो गेल्या चार महिन्यांपासून तिथे सराव करत असून, आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होत आहे.त्याला आंतरराष्ट्रीय कोच अभय देशमुख, तसेच किरण शुरकांबळे आणि सूर्यकांत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रेरणेतून रितेशने राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत.

जलतरणाबरोबरच रितेशने ऍथलेटिक्स, रनिंग, ट्रायथलॉन आणि मॅरेथॉन स्पर्धांमध्ये देखील उल्लेखनीय यश मिळवले आहे.या दुर्मिळ आणि प्रेरणादायी कामगिरीने रितेशने केवळ स्वतःचे नव्हे, तर राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे आणि संपूर्ण मराठवाड्याचे नाव उज्ज्वल केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *