
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कोकण कप विनाशुल्क निवड चाचणीच्या शालेय मुलांच्या कॅरम स्पर्धेत सबज्युनियर कॅरमपटू उमैर पठाण व प्रसन्न गोळे यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
दादर-पश्चिम येथील सिबिईयु एम सभागृहात उपांत्य फेरी मधील पाचव्या बोर्डपर्यंत आघाडी राखणाऱ्या पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडच्या पुष्कर गोळे याला श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरच्या उमैर पठाणने निर्णायक बोर्डात अचूक खेळ करीत १४-१२ अशी बाजी मारली.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत स्पर्धेची इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत विरुद्ध पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे यामधील दुसरी उपांत्य फेरीची लढत देखील अटीतटीची झाली. आर्यन राऊतने ब्रेकचा लाभ उठवीत प्रारंभ ४-० अशा आघाडीने केला. प्रसन्न गोळे याने डावाच्या मध्यापासून आक्रमक व अचूक खेळ करीत पाचव्या बोर्डला १०-१० अशी बरोबरी साधली आणि अखेर १६-१० असा निर्णायक विजय मिळवित अंतिम फेरीमध्ये धडक दिली. अंतिम फेरीचा सामना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ट्रस्टचे मानद सचिव विष्णू तांडेल, सिबिईयुएमचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.